मुंबई नगरी टीम
मुंबई । युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली.या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून,एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच,आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे,असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की,ये दोस्ती आगे चलती रहेगी.संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की ही राजकीय भेट नाही, प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे असेही त्यांनी सांगितले.या भेटीत पर्यावरण,विकासात्मक गोष्टींवर चर्चा,औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली.नितीश कुमार वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी,पर्यावरण यावरही चर्चा झाली. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत,त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.