मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार उद्या दोन दिवसाच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत.उद्या शनिवारी शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीसाठी रवाना होणार असून,रविवारी 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सर्व आमदार,खासदार आणि त्यांचे कुटुंबिय प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.
राज्यात सत्तांतर काळात एकनाथ शिंदे हे ५० आमदारांसह सुरत मार्गे गुवाहटीला गेले होते.त्यांच्या गटातील आमदारांना गुवाहटी मधिल एका पंचतारांकित हॅाटेल मध्ये ठेवण्यात आले होते. गुवाहटी मुक्कामावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांनी गुवाहटी येथिल प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.कामाख्या देवीच्या दर्शनानंतर शिंदे हे आमदारांना घेवून गोव्याला गेले होते.गोव्यातून परत मुंबईत आल्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर तब्बल चार महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा गुवाहटीला जावून कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.मात्र ते गुवाहटीला एकटे जाणार नसून,त्यासोबत त्यांच्या गटाचे आमदार,खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असणार आहे.उद्या शनिवारी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गटाचे आमदार,खासदार आणि त्यांचा परिवार एअर इंडियाच्या विशेष विमानाने गुवाहटीला रवाना होईल.
रविवारी म्हणजेच २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री,आमदार,खासदार हे कामाख्या देवीचे दर्शन घेतील.मात्र या दौ-यात शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे सहभागी होणार नाहीत.जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याकारणाने गुवाहटीला जाणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.शिंदे गटाकडून दोन दिवसांच्या गुवाहटी दौ-याची जोरदार तयारी झाली आहे.यासाठी १८० आसने असलेले एअर इंडियाचे विशेष विमान राखीव करण्यात आले आहे. दरम्यान शिंदे गटाच्या गुवाहटी दौ-यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात,आता ते कुणाचा बळी देतात काय माहित असा टोला त्यांनी लगावत शिंदे गटाच्या गुवाहटी दौ-याला शुभेच्छाही दिल्या.