मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले,सावित्राबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी लावून धरली असतानाच गुजरातची निवडणूक पार पडल्याने येत्या काही दिवसात केंद्र सरकार राज्यपालांना हटविण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.मात्र राज्यपालांना हटवले तरी येत्या १७ तारखेला महाविकास आघाडीचा मोर्चा निघणारच असा ठाम विश्वास पवार यांनी वक्त केलाय.
महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.राज्यपालांना हटविण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील भाजप अडचणीत सापडली आहे.तर उदयनराजे भोसले यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून एक प्रकारे राज्यपाल यांना हटविण्याचे सुतोवाच केले होते. आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्र सरकार राज्यपालांना येत्या काही दिवसात हटविणार असल्याचे संकेत दिले आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही काळात केंद्र सरकार हटविण्याची शक्यता आहे.मात्र केंद्राने राज्यपालांना हटवले तरी येत्या १७ डिसेंबरचा मोर्चा होणारच असा निर्धार अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
गुजरात विधानसभेची निवडणूक पार पडली असून येत्या ८ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये फटका बसू नये म्हणून राज्यपालांना हटविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौ-यावर असून,त्यांनी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यपालांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा आहे.