मुंबई नगरी टीम
मुंबई । महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या नेत्यांवर भाजपाने कारवाई केलेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह काही राजकीय नेत्यांवरही आगपाखड केली.माझा ऐकरी उल्लेख करुन मलाच चर्चेचे आव्हान दिले.चंद्रकांत पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे,त्यांनी लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वाचाळ नेत्यांना गणपतीबाप्पा सुबुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागितली असे म्हणून या थोर महापुरुषांचा अपमान केला वरून आपल्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे म्हणत सारवासारव केली. जनतेत त्याबद्दलही तीव्र संताप उमटला. पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यकर्त्यांने पाटील यांच्यावर शाईफेक केली. शाईफेक करण्याच्या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही पण याप्रकारानंतर दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले तर या घटनेचे वार्तांकन व चित्रिकरण करणाऱ्या पत्रकाराला ३०७ सारखी कलमे लावून अटक करायला लावली. चंद्रकांत पाटील हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत का ? त्या पत्रकारावर एवढी कठोर कलमे लावण्याची खरेच गरज होती का ? असा सवाल करून सूडभावनेने पेटलेल्या सरकारने तत्परतेने कारवाई केली पण महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या नेत्यांवर भाजपाने कारवाई केलेली नाही असेही त्यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह काही राजकीय नेत्यांवरही आगपाखड केली. माझा ऐकरी उल्लेख करुन मलाच चर्चेचे आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे, त्यांनी लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वाचाळ नेत्यांना गणपतीबाप्पा सुबुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो, असेही पटोले म्हणाले.
निवडणुकीच्यावेळी महापुरुषांचे आशिर्वाद घेऊन मतांची भीक मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणुका संपल्यानंतर मात्र याच महापुरुषांचा अपमान करतात.महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यात भाजपा नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजपाने कारवाई केली नाहीच पण साधा निषेध करण्याचे अथवा समज देण्याचे सौजन्यही दाखवले नाही उलट या महनीय व्यक्तींना पंतप्रधानांच्या बाजूला सन्मानाने उभे केले जाते,हा महाराष्ट्राचा व आमच्या दैवतांचा अपमानच आहे.भाजपाचे महापुरुषांच्याबाबत खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत,हेच यातून दिसत आहे,असे पटोले यांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला,सुधांशु त्रिवेदी या प्रवक्त्यानेही अपमान करणारे वक्तव्य केले तर पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरांशी केली.केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला जात आहे. जनतेतून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या नेत्यांवर कारवाई केली नाही उलट या नेत्यांचा भक्कमपणे बचाव केला.भारतीय जनता पक्षाचे नेते निर्ढावलेले आहेत,महापुरुषांबद्दल बोलताना ते कोणताही विधिनिषेध पाळत नाहीतच पण महापुरुषांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आणि त्याचे त्यांना काहीही वाटत नाही.महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूरमधील कार्यक्रमात शेजारी सन्मानाने बसवले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला पंतप्रधान मोदींनी चार खडेबोल सुनावले असते तर पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदरच वाटला असता पण महापुरुषांपेक्षा भाजपाला त्यांचे नेते मोठे वाटतात असेच खेदाने म्हणावे लागत आहे.महापुरुषांची बदनामी करण्याचे हे भाजपचे नियोजित षडयंत्र असून महापुरुषांची बदनामी करण्याचा भाजपचा अजेंडा राज्यपाल चालवत आहेत असेही पटोले म्हणाले.