मुंबई नगरी टीम
नागपूर । अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरून आज विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी काल संसदेत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंनी तब्बल ४४ वेळा फोन केल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने केला.त्यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणेंनी विधानसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून एसआयटी चौकशीची मागणी केली.या मागणी वरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आल्याने गोंधळ झाला.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधव यांना बोलून द्यावे,अशी मागणी केली.या दरम्यान राष्ट्रावादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यत निलंबन करण्यात आले.या सर्व गदारोळात विधानसभेचे कामकाज तब्बल ९ वेळा तहकूब करण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूरात सुरू असणारे अधिवेशनाचे कामकाज शांततेत सुरू असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी मागणी केली. राणे यांच्या या मागणीनंतर सत्ताधा-यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येवून जोरदार घोषणाबाजी केली.अध्यक्षांनी वारंवार सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली.मात्र या मागणीवरून सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र होते.विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधा-यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे सभागृहातील गोंधळात वाढच होत होती.हा गोंधळ सुरू असतानाच अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली.या गोंधळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा केली.या घोषणेनंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.मात्र अध्यक्षांनी ही मागणी फोटळून लावल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येवून घोषणाबाजी केली.
अध्यक्षांनी भास्कर जाधवांना बोलू दण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली.अध्यक्षांनी विरोधकांची मागणी वारंवार फेटाळून लावल्याने ते चांगलेच आक्रमक झाले होते.याचवेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असे म्हटले.त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी याला आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरूवात केली.तर या आक्षेपार्ह विधानवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी जयंत पाटील यांना निलंबित करा अशी मागणी केली. ही मागणी करीतच त्यांनी थेट अध्यक्षांचे दालन गाठले.विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये जयंत पाटील यांच्यावर विधानसभा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह आणि असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला.पुन्हा कामकाजाला सुरूवात होताच उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला तर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे या प्रस्तावाला अनुमोदन दिले.जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव बहुमताने संमत झाला.त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांवर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षेनेते पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभात्याग केला.या सर्व गदारोमुळे सभागृहाचे कामकाज ९ वेळा तहकूब करण्यात आले.