शिवशक्ती भिमशक्तीला टक्कर देण्यासाठी जोगेन्द्र कवाडे आणि एकनाथ शिंदे यांची हातमिळवणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी खासदार जोगेन्द्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि भाजप सोबत राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाने आज अधिकृतरित्या हातमिळवणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कवाडे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती झाल्याची घोषणा आज या दोन्ही नेत्यांनी बाळासाहेब भवन येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या आपल्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या पक्षासोबत युती करावी असा आग्रह धरला होता.पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्येदेखील हाच सूर उमटत होता.त्यामुळे ही युती आकाराला येत असल्याची माहिती कवाडे यांनी यावेळी दिली. आमच्या या युतीच्या जाहीर सभा महाराष्ट्रातील पाच महसुली विभागात घेण्यात येतील अशी घोषणाही कवाडे यांनी यावेळी केली. युतीमध्ये जेवढ्या जागा आमच्या पक्षाच्या वाट्याला येतील त्या लढवू अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली

जोगेंद्र कवाडे हे आक्रमक अभ्यासू नेते आहेत.चळवळीसाठी त्यांनी संघर्ष करून कारावास भोगला आहे. आम्हीदेखील शिवसेनाप्रमुखांचा विचार आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करीत लाठयाकाठ्या खाल्ल्या आहेत. कवाडे यांनी ऐतिहासिक लॉन्ग मार्च काढला होता त्यांचा हा लॉंग मार्च आता योग्य ठिकाणी येऊन थांबला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे गटासोबत युती होत असल्यामुळे तुमची हि युती होत आहे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता,प्रकाश आंबेडकर हे देखील माझे चांगले मित्र आहेत.राजगृह येथे आमची भेट झाली चर्चा देखील झाली. परंतु ती चर्चा राजकीय नव्हती असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.कवाडे यांच्यासोबत आमची फार पूर्वीपासून चर्चा सुरु होती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleमी कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही ;स्वराज्यरक्षक भूमिकेवर अजित पवार ठाम
Next articleवीज कंपन्याचे खाजगीकरण नाही ; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे वीज कर्मचा-यांचा संप मागे