राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राज्यात काँग्रेसचे ” हाथ से हाथ जोडो अभियान”

मुंबई नगरी टीम

नागपूर । देशात भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड चिड असून शेतकरी,तरुणाई बरबाद करायची व्यवस्था मोदी सरकारची आहे.भाजपा सरकारविरोधात जनतेत संतापाची लाट असून राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.भारत जोडो यात्रेला देशात प्रतिसाद मिळालाच पण महाराष्ट्रानेही अभूतपूर्व प्रतिसाद देऊन ही पदयात्रा यशस्वी केली आहे. आता हाच संदेश घेऊन हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात राबविले जाणार असून हे अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण करणारे असेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरच्या राणी कोठी येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीत नाना पटोले बोलत होते. ही बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व हाथ से हाथ जोडो अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, खा. बाळूभाऊ धानोरकर, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपाने करोडो रुपये खर्च केले पण जनता या अपप्रचाराला बळी पडली नाही. भारत जोडो यात्रेतून राहुलजी गांधी यांचे नेतृत्व व खरी ओळख जनतेला झाली असून जनताच मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहीली आहे. २०१९ मध्ये राज्यात ४४ आमदार विजयी झाले व काँग्रेसचे भविष्य काय अशी चर्चा होती पण आता वातावरण बदललेले. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी स्थिती आहे. मुंबई व आसपासच्या परिसरातही काँग्रेस संघटन वाढवून जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काम करा. लोकांना जोडायचे असेल तर संवाद वाढवला पाहिजे, एक परिवार म्हणून प्रत्येकाला सोबत घेऊन जाऊ आणि अखिल भारतीय काँग्रसने दिलेले हाथ से हाथ जोडो अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे करून दाखवू.

यावेळी बोलताना हाथ से हाथ जोडो अभियानाचे प्रभारी पल्लम राजू म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेचा उद्देश सर्वांना माहित आहे आता आपण हाथ से हाथ जोडो अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करावे व अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी निरिक्षकावर असेल. राज्यातील सहा विभागात एक-एक कॅम्प ठेवून अभियानाची माहिती दिली जाईल. जनतेशी संवाद साधणे, संघटन मजबुतीकरण व राष्ट्रीय व राज्य स्तरीय मुद्दे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान एक चांगली संधी आहे.

Previous articleमंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यातील महानगरपालिकांतील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढणार
Next articleउपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला मोकळा नाही,त्याचं डिपॉझिट जप्त करून पाठवलंय !