मुंबई नगरी टीम
मुंबई । शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा महत्वपूर्ण निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे गटाने विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला असून,पक्ष कार्यालयात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकले.मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी काढला नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निकाल दिला आहे.या निर्णयानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी आज विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला.या कार्यालयात असणारे फलक आणि बॅनर या आमदारांनी काढून टाकले.केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शिवसेना आमचा पक्ष आहे.यापुढे इतर कार्यालये ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी सांगितले.विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेताच शिंदे गटाच्या नेत्यांनी या कार्यालयात असणारा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फोटो तसाच ठेवत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकले.