मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानमंडळ नव्हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अडचणीत सापडले आहेत.त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कामकाजाच्या तिस-या दिवशी दोन्ही सभागृहात उमटले.राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करीत विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात प्रचंड गदारोळ घातला.या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज चारवेळा तर विधानपरिषदेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.या प्रकरणाची दोन दिवसांत चौकशी करून बुधवारी ८ मार्च रोजी पुढचा निर्णय जाहीर करू असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.सत्ताधारी सदस्यांनी यावेळी राऊत यांना अटक झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली.गदारोळ थांबत नसल्याने शेवटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभराकरिता स्थगित केले.गदारोळामुळे विधानपरिषदेचेही कामकाज दिवसभराकरिता स्थगित करण्यात आले.
विधानसभेच्या तिस-या दिवसाचे कामकाज सुरू होताच भाजपाचे सदस्य आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला.संजय राऊत यांना सदस्यांना चोर म्हणण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित केला.आपण एकमेकांवर आरोप करू शकतो.पण चोर म्हणू शकतो का.हे कायदेमंडळ असून,चोरांना पकडणारे मंडळ आहे.हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही तर महाराष्ट्रद्रोह आहे.त्यामुळे राऊत यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येवू देत.आपण या सभागृहाचे सदस्य आहोत.चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही.पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून याकडे बघितले पाहिजे.कोणी काहीही बोलायला लागले असे सांगून,त्या बातमीत तथ्य आहे का हे देखील तपासायला पाहिजे.ते बोलले असतील तर योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे पण शहानिशा केली पाहिजे.ती व्यक्ती खरोखर बोलली असली तर ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो,योग्य तो संदेश त्या व्यक्तीला दिला गेलाच पाहिजे असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
या विषयी भाजपचे सदस्य अतुल भातखळकर यांनी आपण सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे.राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ आहे.या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे.हा विधिमंडळाचा तसेच उभ्या महाराष्ट्राचा अवमान आहे.आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवून तातडीने सुनावणी घेउन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भातखळकर यांनी केली.कोणीही असो हे विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे.राऊत यांनी असे खरोखर म्हटले का हे तपासूनही पाहण्याची गरज आहे.सध्या दोन्ही बाजूंनी जो शब्दांचा वापर होतो तो देखील पाहावे.सदस्यांना देशद्रोही म्हणणे हे देखील चूक असे बाळासाहेब थोरात म्हणाले.संजय राऊत यांच्यावर हक्कभंग झालाच पाहिजे.कारण जनतेच्या भावना तीव्र आहेत.यांना असे बोलण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल शिवसेनेचे भरत गोगावले यांनी केला.यावेळी गोगावले यांनी वापरलेल्या एका शब्दावर रविंद्र वायकर यांनी आक्षेप घेतला.त्यानंतर गोगावले यांनी हा शब्द मागे घेतला.भास्कर जाधव यांनी आपण राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही.मात्र चहापानाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदस्यांना उद्देशून देशद्रोही असा शब्द वापरला त्यावरही निर्णय झाला पाहिजे असे जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.या सभागृहालाच चोर म्हणायचे.त्याच ४१ चोरांची मते घ्यायची आणि राज्यसभेत जायचे.संजय राऊत यांनी कोणालाही डिवचायचा ठेका घेतला आहे का असेही पाटील म्हणाले. लोकांच्या मतांवर आम्ही या सभागृहात आलो आहे.मागच्या दरवाजाने आलो नाही.राऊत यांनीच शिवसेनेची वाट लावली आणि सत्यानाश केला आहे.आणि तोच माणूस या सभागृहाला चोर म्हणत आहे.चोर म्हणायचे असेल तर राऊत यांनी आजच खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी मंत्री पाटील यांनी केली..मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील हा हक्कभंग स्वीकारावा व अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली.यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाल्याने विधानसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.या प्रकरणाची दोन दिवसांत चौकशी करून बुधवारी ८ मार्च रोजी आपण पुढचा निर्णय जाहीर करू असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.सत्ताधारी सदस्यांनी यावेळी राउत यांना अटक झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली.गदारोळ थांबत नसल्याने शेवटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभराकरिता तहकूब केले.
विधान परिषदेचेही कामकाज दिवसभरासाठी स्थगित
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमध्ये विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी विधानपरिषदेत करीत राऊत यांच्या अटकेची मागणी विधानपरिषदेत लावून धरली.या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि सत्ताधारी भाजप सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहात गोंधळ झाला. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून,त्यांच्यावरील हक्कभंगाची सूचना तपासून उद्या निर्णय घेतला जाईल असे सांगतानाच राऊत यांना अटक करण्याचे निर्देश देणार नाही असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
विधान परिषदेत सलग दुसऱ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही.काल मंगळवारी कांदा आणि कापसाच्या मुद्यांवरून विरोधकांनी गोंधळ घातला होता.त्यामुळे कामकाज होवू शकले नाही. आज सत्ताधा-यांनी राऊत यांच्या वक्तव्यावरून गदारोळ करत कामकाज बंद पाडले. विधान परिषदेचे कामकाज सुरु होताच भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्ताव मांडला. यास अनुमोदन देऊन भाजपचे राम शिंदे बोलत होते.त्याचवेळी दरेकर यांनी संजय राऊत यांनी विधानमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याने हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली. त्यास विरोधकांनी हरकत घेतल्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.त्यामुळे दोनदा सभागृह तहकूब करण्यात आले. तिसऱ्यांदा सभागृह सुरु झाल्यानंतर राऊतांच्या अटकेची मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी होत असेल तर विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.
महाराष्ट्र विधानमंडळाचा देशात नावलौकीक असून,यशवंतराव चव्हाणांपासून या सभागृहाची मोठी परंपरा आहे.मात्र राऊतांनी संपूर्ण विधान मंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यात सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकही आले.राऊत यांचे वक्तव्य आपण ऐकलेले आहे. कोणी कोणाला राष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही असे म्हणता कामा नये. सत्ता पक्ष नव्हे तर संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हटले जात असेल अशा चोरमंडळात काम करण्यापेक्षा घरी बसलेले बरे अशा संतप्त स्वरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला.राऊत यांच्या वक्तव्याने सभागृहाचा अपमान झाल्याच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत, मग विरोधकांना देशद्रोही म्हणणेही तितकेच गंभीर आहे. राऊतांवर हक्कभंग दाखल केला जात असेल तर सर्वांना समान न्याय हवा, अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केली.त्यांच्या मागणीवर सत्ताधारी अधिक आक्रमक झाले. सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागी येऊन घोषणा देत त्यांनी संजय राऊत यांच्या अटकेची मागणी लावून धरली. उभय पक्षातील सदस्यांच्या गोधळात उपसभापती गोऱ्हे यांनी अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.