मुंबई नगरी टीम
बीड । आगामी १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या ९ तारखेला पक्षाची अहमदनगर येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेला बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराला मानणारे नागरिक अशी सर्वांची रेकॉर्डब्रेक गर्दी अहमदनगरला उपस्थित राहावी, असे नियोजन करून अहमदनगर येथील पवार साहेबांच्या सभेत बीड जिल्ह्याचा ठसा उमटवू, असे आवाहन करीत, दिल्ली आणखी माझ्यासाठी खूप दूर आहे असे सांगून लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे दिले.
येत्या ९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची जाहीर सभा संपन्न होणार आहे. आगामी काळातल्या निवडणुकांच्या व राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्वाची असून, या सभेला अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून देखील हजारो नागरिक संमिलीत व्हावेत, याचे नियोजन करण्यासाठी पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते.या बैठकीस आ.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.संजय भाऊ दौंड, विजयसिंह पंडित, ज्येष्ठ नेते ऍड.बागल, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, सतीश शिंदे, नारायण शिंदे, अविनाश नाईकवाडे, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड यांसह विविध आघाडीचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर आ.धनंजय मुंडे यांच्या सह सर्व लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत अहमदनगर येथील सभेबाबत माहिती देत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी पत्रकारांनी आ.धनंजय मुंडे यांना लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या एका व्हायरल यादीचा संदर्भ देत तुम्ही लोकसभा लढणार का असा प्रश्न केला, त्यावर धनंजय मुंडे यांनी आपल्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे, असे उत्तर दिले.माझी माझ्या पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून राज्यात अधिक उपयुक्तता आहे, त्यामुळे पक्ष मला लोकसभा लढायला लावणार नाही, बीड लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी व्हावे,हे आमचे लक्ष्य आहे हे निश्चितच सत्य आहे, मात्र मी स्वतः उमेदवार असेल, ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे, असे स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी सांगितले.