मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सामील झाल्याने राज्यातील सरकार अधिक मजबूत झाले असून, अजित पवार हे सरकारमध्ये आल्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील महायुतीचे सरकार पडणार या केवळ अफवा असून माझ्या मागे मोदी-शाहांची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.विरोधकांनी पहिले आपल्या जळत्या घराकडे पाहावे आणि आत्मपरीक्षण करावे असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्याच्या गटातील ८ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्याने गेले वर्षभर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा गेली काही दिवस होती.त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरुन राजीनामा देणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण देत या सर्व वृत्ताचे खंडन केले.अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे.गेल्या वर्षभरात झालेला विकास पाहूनच अजित पवार यांनी सरकार सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या येण्याने राज्यातील सरकार अधिक मजबूत झाले असून शिवसेनेतील कोणतेही आमदार नाराज नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,ज्या दिवसापासून शिंदे-फडणवीससरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार अशा अफवा सुरू दाल्या आहेत.आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ असल्यामुळे सरकारला कसलाही धोका नाही.अजित पवार यांच्या शपथविधीनंतर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्यावर होणाऱ्या टीकेला काहीही अर्थ नाही.विरोधकांनी पहिले आपल्या जळत्या घराकडे पाहावे आणि आत्मपरीक्षण करावे अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.