मुंबई नगरी टीम
मुंबई । येत्या १७ जुलै पासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाज ठरविण्यात आले.१९ दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस १५ दिवस राहणार असून शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या १७ जुलैपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाज ठरविण्यात आले.तीन आठवडे चालणा-या पावसाळी अधिवेशनात कामकाजाचे दिवस १५ दिवस राहणार असून शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत.विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, गिरीश महाजन, अशोक चव्हाण, उदय सामंत, अमिन पटेल, आशिष शेलार, नरहरी झिरवाळ, तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, विकास पोतनीस, कपिल पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.या बैठकीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील,काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.