मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत आहोत. लोकाभिमुख निर्णय तसेच जनतेला न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश केलेल्या विकासाच्या पंचसूत्रीनुसार सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे.त्यांच्या शौर्याला स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.माझी माती माझा देश अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत.स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला,त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,”असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, आमदार मनीषा कायंदे, आमदार आशिष शेलार,आमदार यामिनी जाधव, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली.ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली.अशा अगणीत हुतात्म्यांच्या त्यागाने,बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण माझी माती माझा देश या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या मंत्राचा जागर आजच्या काळात आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांनी योगदान दिले. त्यामुळे केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे,याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्य विभागाने आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित केले. देशात आपल्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या विभागाने हर घर तिरंगा उपक्रमात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला. इंडिया@ ७५ या उपक्रमात आपण तब्बल १० लाख ६४ हजार ४१० कार्यक्रम घेतले, याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुकोद्गार काढले.ऑगस्ट क्रांती मैदानाच्या ऐतिहासिक आठवणी, घटना आहेत. ते जपण्याचे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे सांगून राज्यातही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,विविध यंत्रणा या सर्वांच्या समन्वयाने हे अभियान यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.