मुंबई नगरी टीम
बीड । बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने साहजिकच जिल्ह्यात आमचा सहभाग आहे.धनंजय मुंडे यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होणार नाही असे सांगतानाच बीड लोकसभा मतदारसंघातून मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला आहे.
भाजपाने बीड मधून विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना संधी दिली.त्यांनतर प्रथम पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.खासदार प्रीतम मुंडें यांच्याऐवजी पक्षाने मला उमेदवारी दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे.पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही.त्यांना फार काळ काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही,अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी खा. प्रितम मुंडे हया देखील यावेळी उपस्थित होत्या.गेल्या दहा वर्षापासून खासदार प्रितम मुंडे या चांगले काम करीत आहेत.पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा नक्की होती.त्यात माझे नाव जाहीर झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही. आम्हा दोघी बहिणींमध्ये चांगला समन्वय आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत साहजिकच जिल्ह्यात आमचा सहभाग आहे. धनंजय मुंडे यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होणार नाही उलट अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मी राज्यात काम करायचे आता मला वेगळ्या विभागात जावे लागणार असल्यामुळे नवीन जबाबदारी दिल्याने मनामध्ये थोडी हुरहुर आहे. राज्यात व जिल्ह्यातील राजकारणात धोरणात्मक निर्णय घेत असे व प्रीतम मुंडे या वैयक्तिक पातळीवर सर्व गोष्टी सांभाळत होत्या.त्यामुळे दोन्ही बाजू सांभाळण्याचे काम यापुढेही आम्ही करत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकारण मुळातच खडतर प्रवास असल्याने राजकीय वनवास संपला असे कधीही म्हणता येणार नाही. पदावर असल्यावर अडचणी नसतात असे मुळीच नाही त्यामुळे हा प्रवास अगदी खडतर असतो, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.यावेळी खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या पंकजा मुंडे माझ्या नेत्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे मला त्यांना कोणताही सल्ला देण्याची गरज नाही.नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सगळे वाट पाहत होतो.त्यादृष्टीने ताईंना उमेदवारी मिळाली त्याचा मला आनंद आहे. सक्षम, अभ्यासू नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेले आहे.माझ्यापेक्षा त्यांनी जास्त काम केंद्रातील नेतृत्वाबरोबर केलेले आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांना सर्वाधिक मतांनी विजय मिळवून देणे हेच माझे धेय असेल असे त्या म्हणाल्या.