बीडमध्ये मतदान केंद्रे ताब्यात घेतली, मुस्लिम व मागासवर्गीयांना मतदान करू दिले नाही

मुंबई नगरी टीम

बीड । राज्यात काल सोमवारी चौथ्या टप्पात ११ मतदारसंघासाठी मतदान पार पडले.बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात प्रामुख्याने लढत असून,काल बीडमधील अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. तर काही मतदान केंद्रावर मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांना मतदान करू दिले नसल्याची तक्रार त्यांनी करून या सर्व मतदान केंद्रावर इनकॅमेरा फेरमतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काल मतदान सुरू झाल्यानंतर एका तासातच परळी मतदारसंघातील इंजेगाव, सारडगाव, धर्मापुरी, डिग्रस,नाथ्रा,कौडगाव, सावळा जिरेवाडी, वालेवाडी,कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्रावर तसेच केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव याशिवाय माजलगावमधील गोविंदवाडी तसेच धारूरमधील सोनिमोहा, पिंपरवडा, मैंदवाडी व चाडगाव आष्टी मधील वाली आणि पाटोद्यातील वाघीरा हे मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केले असल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.परळी व इतर मतदार संघातील काही मतदान केंद्रावर इनकॅमेरा मतदान घेण्याची विनंती आपण निवडणूक निरीक्षकांना ९ मे २०२४ रोजी केली होती, परंतु त्यांनी याबाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही व तसे कळविले नाही, असेही सोनवणेंनी या तक्रारीत म्हटले आहे.आपण याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिक्षक बीड यांना बोगस मतदान थांबवण्याची विनंती केली, मात्र त्याची कोणीही दखल घेतली गेली नसल्याचे सोनवणे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय काही मतदान केंद्रावर मुस्लीम आणि मागासवर्गीय मतदारांना मतदान करू न दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.वरील घटना गंभीर, असंवैधानिक, गुन्हेगारी स्वरूपाच्या असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आहेत, असं म्हणत वरील सर्व मतदान केंद्रांवर इनकॅमेरा फेरमतदान घ्यावं आणि लोकशाही वाचवावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

Previous articleकोरोना काळात काँग्रेस व मविआ सरकारचाच उत्तर भारतीयांना मदतीचा हात
Next articleमतदान संपताच पंकजा मुंडे लागल्या कामाला ; पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी