महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील; शिंदे गटाच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी दिलेले उमेदवार ज्या पद्धतीने निवडणूक लढले त्यानुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील,असा दावा शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीचा राज्यातील शेवटचा टप्पा काल सोमवारी पार पडला.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होती.त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुती आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडला होता.मुंबईतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहाही मतदार संघ पिंजून काढले होते.तर दुसरीकडे मुंबईतील या सहा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात असतानाच शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यात चांगल्या जागा मिळतील असा दावा केला आहे. कीर्तीकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात ठाकरे यांच्या शिवसेनेने गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.तर शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी पुत्राचा प्रचार न करता रवींद्र वायकर यांचा प्रचार केला.मुलासोबत टर्निंग पॉईंटला सोबत नव्हतो अशी खंत गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि मी अमोल आमच्या सोबत येण्यासाठी आग्रह केला पण तो शिंदे यांच्या सेनेत आला नाही असे सांगून,ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिलेले आहेत,ते लढत आहेत.त्यानुसार महाविकास आघाडीला राज्यात चांगल्या जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.

Previous articleमणीपूर जळत असताना कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना उज्ज्वल निकम कुठे होते ?
Next articleपुण्यातील ” हिट अँड रन ” प्रकरणी कुणालाही सोडणार नाही