मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यागटाकडून उमेदवारी मिळवायची.येथून अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तिकर हे दोनच उमेदवार राहतील आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर उमेदवारी मागे घेणार व आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला.त्या दृष्टीने वागणूक दिली. परंतु कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता ते आता स्पष्टपणे बाहेर येत असल्याचेही दरेकर म्हणाले.कीर्तिकरांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की,मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी घेवून आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तीकर यांचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप दरेकर यांनी केला.यावेळी त्यांनी पुण्यातील अपघाताचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला.अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले,ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का ? अनिल देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोला दरेकरांनी लगावला.मुंबईतील सहाच्या सहा जागा भाजपा आणि शिवसेना जिंकेल.राज्यात ४५ पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू. परंतु ४० च्या वर भाजपा व महायुती शंभर टक्के जागा जिंकू ४० च्या खाली एकही जागा नसेल असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे कामे आहे. त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे. या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मी सत्ताधारी पक्षाचा असून भुमिका घेतलेली आहे. मी प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो. कोंबड्याचा खुराडा असतो तशा प्रकारची व्यवस्था होती.घुसमटून लोकं मेली नाहीत हे आपले नशीब आहे. मतदान केंद्रे वातानुकुलीत असावी, मतदान केंद्रे वातानुकुलीत असावेत. एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज आहे. येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश करणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.