ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. येथिल कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते आजारी असल्याने कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत.

शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. १९४८ साली आलेल्या ‘आग’ व १९५१ साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले. तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. जब जब फूल खिले या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत. जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.. दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. मा.शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. मा.शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. हिंदी चित्रपटांबरोबरच मा.शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे मा. शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग ३६ चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. शशी कपूर यांना २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी मा.शशी कपूर यांना २०१४ साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. १६० चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

Previous articleकोकणातील वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरीच्या जमिनीची मोजणी सुरु करण्याचे निर्देश
Next articleओखीग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करून मदतकार्य सुरु करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here