डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये
१३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता १३ डिसेंबर ऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, या नगरपरिषदांच्या नामनिर्देशनपत्रांसदंर्भातील न्यायालयांचे निकाल आणि संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार तीन ठिकाणी १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. १८ डिसेंबर रोजी मतमोणजी होईल. त्याचबरोबर खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.६-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १३ डिसेंबर ऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार इगतपुरी, त्र्यंबक (जि. नाशिक) व जत (जि. सांगली) नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. हुपरी (जि. कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (जि. नंदुरबार), किनवट (जि. नांदेड), चिखलदरा (जि. अमरावती), पांढरकवडा (जि. यवतमाळ), वाडा (जि. पालघर), शिंदखेडा (जि. धुळे), फुलंब्री (जि. औरंगाबाद) आणि सालेकसा (जि. गोंदिया) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.
इगतपुरी, त्र्यंबक आणि जत येथे उद्या मतदान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबक आणि सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेसाठी रविवारी (ता.१०) सदस्यपदांसोबतच थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होईल. त्याचबरोबर सटाणा (जि. नाशिक) नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५-अ च्या रिक्तपदासाठीदेखील रविवारीच मतदान होणार आहे.
इगतपुरी नगरपरिषदेच्या एकूण ९ प्रभागातील १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ४६८ मतदार असून त्यांच्यासाठी ३४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या एकूण ८ प्रभागातील १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण १० हजार ६१४ मतदार असून त्यांच्यासाठी १७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे.
जत नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागातील २० जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ५६० मतदार असून त्यांच्यासाठी ३६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ असेल. तीनही नगरपरिषदांची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल.

Previous articleतुम्हाला सत्तेची मस्ती आलीय का ?
Next articleसिंधुदुर्ग जालना लातूर अहमदनगर,पंढरपूर मध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here