आर्थररोड कारागृहातून छगन भुजबळ यांचे सरकारला पत्र

आर्थररोड कारागृहातून छगन भुजबळ यांचे सरकारला पत्र

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करा

नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आर्थररोड कारागृहातून लेखी पत्राद्वारे  मदतकार्य व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ यांनी कारागृहातुन लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी चक्रीवादळाचा कोकणासह उत्तर, पश्चिम व मध्य महाराष्ट्रालासुद्धा फटका बसला असून यात अवकाळी पावसामुळे कोट्यावधींची पिकहानी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात तर सुमारे दीड लाख एकरावरील द्राक्षबागा अवकाळी पावसासह ढगाळ हवामान व थंडीच्या संकटात सापडल्या असून या बागांवर डावनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. सदर  वादळाने आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे द्राक्ष, कांदा, मका,कापूस व पालेभाज्या इ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगामी काळात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे रोगराई पसरून पिकांचे आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान  झालेल्या पिकांचे  त्वरित पंचनामे होण्याची अपेक्षा असतांना प्रशासन मात्र यासंदर्भातील नियमांकडे बोट दाखवून पंचनाम्याऐवजी तूर्त केवळ प्राथमिक अहवाल तपासण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.  ६५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला तरच नुकसानीचे पंचमाने व्हावेत अशी सुधारणा अलीकडेच  करण्यात आल्याचे समजते. दि. ५ डिसेंबर रोजी ओखी वादळामुळे निर्माण झालेली ही स्थिती नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची गरज आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून नियमांवर बोट ठेवले जात  असल्याने या नुकसानीचे पंचनामे आणि भरपाईबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सदर वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मासळीसोबतच मच्छीमारांच्या बोटी आणि साहित्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर याअगोदर आक्टोंबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब, भाजीपाला इ. पिकांचे अतोनात नुकसान आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांचे होणारे नुकसान यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अत्यंत हतबल झाला आहे. मागील वर्षी द्राक्ष हंगामात द्राक्ष पिक उत्पादन चांगले होते. पण देश विदेशात बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली. तरीसुद्धा  जराही आत्मविश्वास न ढळू देता आपली इच्छाशक्ती व उद्याच्या आशेवर शेतकरी पुन्हा नव्या जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करीत असतांना सप्टेंबर  मध्ये छाटणी केलेल्या  द्राक्ष बागा  ऐन फुलोऱ्यामध्ये असतांना आक्टोंबर मध्ये अतिवृष्टी झाल्याने द्राक्ष फुलोरा झडला  गेला. तसेच द्राक्ष घड सडून,फळकुज प्रमाण खूपच वाढल्याने यंदाच्या  द्राक्ष हंगामात अंदाजे ३० ते ४० टक्के द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे  शेतकऱ्यांमध्ये उदासीनतेची भावना निर्माण होवू पाहत आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे काही ठिकाणी पंचनामे केलेले आहे तर काही ठिकाणी अद्यापही पंचनामे केलेले नाही.  सदर चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानींचे तातडीने पंचनामे करण्यात येवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे.

Previous articleनॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये
Next articleठाणे जिल्हा परिषदेसाठी ६५; तर १० नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी ७३ टक्के मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here