मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागात घोटाळा

मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागात घोटाळा

धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर : पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात गेल्या ३ वर्षात हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य ठरले आहे. सर्व मंत्री भ्रष्टाचार करून झाले, आता मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत या घोटाळ्यांचे लोन गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा पुरवठादार नियुक्तीत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाने लाळ्या खुरकत लसीच्या निविदेत आणि ग्रामविकास विभागाने सॅनिटरी नॅपकीन्स या निविदेतही भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतानाच जीएसटीच्या बेकायदा सुटीमुळे राज्य सरकारचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत मुंडे यांनी एकाच वेळी चार खात्यातील भ्रष्टाचारांवर हल्लाबोल करून विधान परिषद दणाणुन सोडली.

हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी सरकारमधील विविध खात्यांमध्ये चाललेला मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर वैयक्तिक लाभाच्या योजना लाभ देण्यासाठी नियुक्त केलेल्या इनोव्हेव कंपनीलाच काम मिळावे या पध्दतीने निविदा बनवणे त्यांच्या सोईनुसार वेगवेगळी ८ शुध्दीपत्रके  काढणे, कंपनीच्या कामात १९३ सेवा समाविष्ट असताना १९ विभागांच्या एकाही प्रतिनिधीचा समावेश न करणे, आदी बाबी जाणीवपूर्वक केल्याचे ते म्हणाले. कंपनीने शिष्यवृत्तीत गोंधळ तर घातलाच कर्जमाफीलाही विलंब लावल्याचे सांगताना या कंपनीला प्राथमिकरित्या दिसणारे काम ५५ कोटींचे असले तरी, प्रत्यक्षात एका सेवेसाठी ६ महिन्याला ५ कोटी रुपये द्यायचे आहेत, त्यामुळे हा संपुर्ण घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असून, याची चौकशी  व कारवाई न झाल्यास संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडेही गेल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

मर्जीतील बॉयोव्हेट कंपनीला जनावरांना लागणाऱ्या लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्याचे काम देण्यासाठी पुशसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जाणीवपुर्वक वारंवार फेरनिविदा करण्यास विभागाला भाग पाडले. जादा दराने आणि उत्पादन क्षमता, रोग प्रतिकारक क्षमता नसलेल्या मर्जीतील मे. इंडियन ईम्युनोलॉजिकल्स प्रा.लि. या कंपनीला काम दिले. विभाग आणि सचिवांचे अभिप्राय डावलल्याची कागदपत्रे सादर करीत या प्रकरणी हि निविदा रद्द करून मंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

ग्रामविकास विभागाने केलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सच्या खरेदी निविदेतही अनियमितता झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. चिक्की घोटाळ्यातील एक आरोपी कंपनी वैद्य इंडस्ट्रीज या कंपनीला १ हजार ४४ कोटी रुपयांचे ३ वर्षांचे एकाच वेळी काम दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. ही निविदाही कंपनीला समोर ठेवुनच राबवल्याचे सांगुन आपण या संबंधी तक्रार पत्र देऊनही त्याची दखल न घेता, चौकशी न करता ही अनियमितता करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

नॅचरल गॅस या व्हॅटमधील वस्तुला मुल्यवर्धीत कर प्रणालीतून संगणमताने सुट देत ४०० कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान करण्यात आल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. सदर चुक लक्षात आल्यानंतर अतिशय घाईघाईने परिपत्रक काढले असले तरी  त्यामुळे शासनाचे दरमहा शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. भविष्यातही हे नुकसान होणार असल्याने विक्रीकर आयुक्तांशी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Previous articleभाजप आमदाराच्या रूममध्ये साप !
Next articleगुन्हयांमध्ये महाराष्ट्र पहिला,दुस-या आणि तिसऱ्या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here