विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान!

विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान!

मुंबई :  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेसाठी निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सोमवारी ९९.८१ टक्के मतदान झाले.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली, या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग), जयवंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भारतीय जनता पार्टीचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) या सदस्यांची मुदत संपत असल्यामुळे येथे मतदान झाले. सोमवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. गुरूवारी, २४ मे रोजी मतमोजणी होईल.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्गमद्ये ९४० सदस्यांपैकी ९३८ सदस्यांनी (९९.७९ टक्के) मतदान केले. नाशिकमध्ये ६४४ सदस्यांपैकी ६४४ म्हणजेच शंभर टक्के मतदान झाले. उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात १००५ सदस्यांपैकी १००४ सदस्यांनी (९९.९० टक्के) मतदान केले. परभणी-हिंगोलीत ५०१ सदस्यांपैकी ४९९ सदस्यांनी (९९.६० टक्के) मतदान केले. अमरावतीत ४८९ सदस्यांपैकी ४८८ सदस्यांनी (९९.८० टक्के) मतदान केले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात १०५९ सदस्यांपैकी १०५६ सदस्यांनी (९९.७२ टक्के) मतदान केले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगडमधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होत आहे. याठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिकमध्येही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे. याठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. येथून भाजपाचे बंडखोर परवेझ कोकणी निवडणूक लढवत असून भाजपाकडून ऐनवेळी त्यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघमधून काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपाचे रामदास अंबटकर आमने सामने आहेत. परभणी-हिंगोलीमधून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत होत आहे. येथेही भाजपाचे बंडखोर सुरेश नागरे उभे आहेत. तेथेही भाजपाचे बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावतीमध्ये भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघातील लढत चुरशीची होत आहे. येथे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

Previous articleउद्धव ठाकरे युपीचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ आमने सामने
Next articleनविन ९९ लाख लाभार्थी घेतील अन्न सुरक्षेचा फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here