मुंबई नगरी टीम
पुणे: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र त्यावर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून हल्लाबोल केला आहे.कृषी खात्यातील अनागोंदीचा पर्दाफाश करतानाच राज्यातील शेतकऱ्यांना ३५हजार कोटी रूपयांच्या कर्जमाफीचे जे स्वप्न दाखवले ते कधी साकार होणार, असा सवाल केला आहे.
शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला. त्यावर टीका करताना सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवी होती,याची यादीच दिली आहे.सुळे यांनी म्हटले आहे की,कृषी खात्याला पूर्णवेळ मंत्री आणि सचिव कधी मिळणार,पुरेसे कृषी उपसचिव नाहीत.ते कधी मिळणार,शेतकऱ्यांचे रडगाणे असे उद्गार काढणाऱ्या गुलाबराव पाटलांना मंत्रिमंडळातून कधी काढणार,२०१५पासून महत्वाचे कृषी पुरस्कार दिलेले नाहीत.त्यांची फाईल तरी आपल्यापर्यंत पोहचली आहे का,असे सवाल ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केले आहेत. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. तसेच कृषी सचिवांची संख्या अपुरी असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न लटकले आहेत,यावर सुळे यांनी प्रकाश टाकला आहे. मुख्यमंत्री कितीही दावा करत असले तरीही कर्जमाफी हे स्वप्नच राहिले आहे. ते कधी पूर्ण करणार, असा खोचक सवालही मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच आता कामाला लागा.प्रचाराच्या इव्हेंटमध्ये सरकारचा वेळ वाया घालवू नका, असा सल्लाही दिला आहे.