मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
गोयल म्हणाले की, नवी दिल्ली येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला देशभरातील बारा हजार नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनात देशातील राजकीय स्थिती, मोदी सरकारने केलेले गरीब कल्याणासाठीचे कार्य आणि आगामी निवडणुकीची तयारी याविषयी चर्चा झाली. अधिवेशनानंतर अत्यंत उत्साही वातावरणात सर्व कार्यकर्ते विजय संकल्प करून आपापल्या प्रदेशात परतले असून भाजपाच्या पूर्ण बहुमताने आणि एनडीएच्या दोनतृतियांश बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत.
भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाआघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी त्या आघाडीला कसलाही वैचारिक आधार नाही. त्यांना स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी मजबूर सरकार हवे आहे. यापूर्वी देवेगौडा, चरणसिंग, गुजराल, व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे देश त्रस्त झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला मजबूत सरकार दिले आहे. आता देशाला मजबूत सरकार आणि मजबूर सरकार यापैकी एक निवडायचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी एकूण मतांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून भाजपा निर्णायक विजय मिळवेल असेही गोयल यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे. गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा वाढला आहे. देशाची आर्थिक क्षमता वाढल्यामुळे गरीब कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येकाला वीज, गॅस कनेक्शन, शौचालय, आरोग्य सेवा अशा योजनांचा कोट्यवधींना लाभ झाला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. या सरकारने अभूतपूर्व बदल घडविला आहे.