मुंबई नगरी टीम
मुंबई: नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका यांनी आता थेट शिवसेनेशीच पंगा घेतला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यावर शोभा डे यांनी आपल्या ट्विटमध्ये आणखी स्मारकांची गरज कुणाला आहे? स्मारकांऐवजी शाळा आणि रूग्णालये बांधा,असे ट्विट केले आहे.यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून शिवसेना आता काय उत्तर देते,याची उत्सुकता आहे.
बाळासाहेबांचे स्मारक हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बापाचे स्मारक बांधता येत नाही ते राम मंदिर काय उभारणार असे म्हणून त्यांना डिवचले आहे.या पार्श्वभूमीवर शोभा डे यांच्या ट्विटमुळे शिवसेनेचा संताप होणार आहे.डे यांनी म्हटले आहे की,मला शंभर कोटी रूपये द्या.त्यांचा कसा उपयोग करायचा हे मी दाखवते.आम्हाला स्मारके नको आहेत तर शाळा आणि रूग्णालये हवी आहेत.बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असल्यामुळे डे यांच्या या ट्विटवर शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.त्यातच राजकीय वादही पेटण्याची शक्यता आहे.निवडणुका तोंडावर आल्याने बाळासाहेबांचे स्मारक हा मुद्दा दोन्ही बाजूंकडून वापरला जाणार आहे.