मुंबई नगरी टीम
मुंबई : देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला इतर मदतीबरोबर हक्काची शेतजमीन देण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाची राज्य शासनाकडून जाणिवेने अंमलबजावणी करण्यात येत असून अशा जमिनीसाठी मागणी केलेल्या आठ शहिदांच्या कुटुंबांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनी जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, तर उर्वरितांसाठीची प्रक्रिया सुरू आहे. या कुटुंबीयांना सोयीच्या ठिकाणी जमीन देण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित असून त्यातून त्यांच्याप्रती देश आणि समाज म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः देशाच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम त्याग करणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा, त्यांच्या अवलंबितांना समाजात प्रतिष्ठेने राहता यावे यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने शासनाने सैन्य तथा सशस्त्र दलातील वीर मरण आलेल्या राज्यातील अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या विधवा, वीरमाता, वीरपिता यांनी शासनाकडे शेतीयोग्य जमिनीची मागणी केल्यास त्यांच्या सोयीनुसार शेतजमिनीचे वाटप करण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील शहीद सैनिकांच्या आठ कुटुंबीयांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे, शहीद अक्षय सुधाकर गोडबोले, शहीद बालाजी भगवानराव अंबोरे, कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद राजेंद्र नारायण तुपारे, शहीद महादेव पांडुरंग तुपारे, शहीद प्रवीण तानाजी येलकर, शहीद अनंत जानबा धुरी तर नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी यशवंत कदम यांच्या कुटुंबीयांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय अन्य शहिदांच्या कुटुंबीयांना जमीन वाटपाबाबत योग्य ती कार्यवाही होत आहे. या कुटुंबीयांना सोयीची असलेली जमीन देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ज्या ठिकाणी अशी जमीन उपलब्ध नाही तेथे त्यांना अन्य पर्यायी ठिकाणची जमीन देण्याबाबत विचारणा करण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही होत आहे.