मुंबई नगरी टीम
मुंबई: भाजप आणि शिवसेनेतील लोकसभा निवडणुकीसाठी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे समजते.नव्या फॉर्म्युल्यानुसार,भाजप शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यास तयार झाला आहे.भाजप २५ आणि शिवसेना २३ जागा लढवणार आहेत. युतीचे गणित आता जुळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,युतीचा विवाह निश्चित असून वधु पक्ष आणि वरपक्षाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ तर सेनेने २२ जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप आणि शिवसेना २३ जागा लढवतील.भिवंडी किंवा पालघर या जागांवर शिवसेना दावा सांगत आहे.पण या दोन्ही जागा सोडण्यास भाजप तयार नाही.म्हणून या दोन जागांच्या ऐवजी तिसरी एखादी जागा भाजप शिवसेनेला सोडू शकतो.
खुद्द शिवसेनेत युतीच्या मुद्यावर दोन गट आहेत. एकनाथ शिंदे,मिलिंद नार्वेकर,अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे युती करण्याच्या बाजूने आहेत तर संजय राऊत,दिवाकर रावते आणि रामदास कदम हे युती करण्यास अनुकूल नाहीत तर काही खासदार युतीच्या बाजूने आहेत.राज्यसभेत बसलेलेच शिवसेना नेते युती नको म्हणून आग्रह धरत आहेत. येत्या काही दिवसांत युतीवर शिक्कामोर्तब होईल,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपवर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेची धार कमी झाली आहे.अर्थसंकल्पावरील सामना तील अग्रलेखातही नरमाईचा सूर होता.पूर्वी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर शिवसेना तुटून पडत होती.आता भाष्य सौम्य झाली आहे.त्यावरून युतीची शक्यता पुन्हा दाट झाली आहे. पंतप्रधानांना उद्धव ठाकरेंनी चोर म्हटले तर अमित शहांनी उठाके पटक देंगे अशी भाषा केली होती.त्यानंतर आता उभय पक्षांमधील संबंध खूपच निवळले आहेत.