मुंबई नगरी टीम
मुंबई : नांदेड मध्ये येत्या २० तारखेला महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असला तरी १ मार्चला काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेने होणार आहे. महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौ-यात राहुल गांधी मुंबई आणि धुळ्यात जाहिर सभा घेणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ येत्या २० तारखेला नांदेड मध्ये फुटणार असला तरी काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहिर सभेने होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे संजय निरूपम यांनी दिली. राहुल गांधी यांच्या मुंबई आणि धुळ्यात जाहिर सभा होणार आहेत. गेली साडे चार वर्षात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दर महिन्याला सुमारे १० लाख नवीन तरुण बेरोजगार होत आहेत. दरवर्षी सुमारे १ करोड ५० लाख तरुण बेरोजगार होत आहेत. भाजप सरकारच्या नोटा बंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे संपूर्ण देशात बेरोजगारी वाढलेली आहे. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून काँग्रेसतर्फे “चलो वार्ड अभियान” तरुण बेरोजगारांना नोकरी आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे अभियान सुरु केले असल्याची माहिती निरूपम यांनी दिली.