शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा
मुंबई नगरी टीम
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच उमेदवार आहेत.मात्र माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात कमालीचे वितुष्ट आहे. याचा प्रत्यय खुद्द पवारांनाच आज आला. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादीमधील गटबाजी उफाळून आली आहे.
फलटण येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कविता म्हेत्रे यांना व्यासपीठावर पाहून शेखर गोरे संतापले.शेखर गोरे यांनी पवारांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर गेले.पवारांना त्यांनी थांबवले आणि स्वतः बोलण्यास सुरूवात केली.हा प्रकार पाहून पवारांसह सारेच हतबल झाल्याचे दिसले.खुद्द पवारांना आपले भाषण थांबवावे लागले.मात्र गोरे यांनी हा माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि आपल्यातील अंतर्गत वाद असल्याचे सांगितले.देशमुख यांनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणात लक्ष घालू नये,असे गोरे म्हणाले. पवारांबद्दल मला आदर आहे. पण पक्षाचे निर्णय माझ्यापर्यंत पोहचू दिले जात नाहीत. मला पवारांपर्यंत जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारी त्यांनी केल्या. हा सर्व प्रकार पवारांच्या समोर सुरू होता आणि पवार काही करू शकले नाहीत. शेखर गोरे हे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. आता राष्ट्रवादी काय कारवाई करते,याची उत्सुकता आहे. पवारांना मात्र आपल्याला निवडणूक किती अवघड आहे,याची कल्पना आली असेल,असे माढ्यात बोलले जाते.