वायुदलाने केलेल्या धाडसी कारवाईचे विधिमंडळात अभिनंदन
मुंबई नगरी टीम
मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग करून ते नेस्तनाबुत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले.या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहिदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये,यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले होते.भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्यावतीने सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादयांच्या अड्डयावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले.आज वायुदलाच्या जवानांचा अभिनंदन करण्याचा ठराव आहे त्याला माझा पाठिंबा आहे असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
आज भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवादयांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडलं असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे देखील देशाच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी यापुढेही आपण सगळेजण भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी तनमनाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.