आज अधिवेशन गुंडाळणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या कारणास्तव मुंबई येथे सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुंडाळण्याची शक्यता आहे. विधिमंडळ आणि परिसरातील सुरक्षे ऐवजी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे यासाठी हा निर्णय धेतला जाणार आहे. त्यासंदर्भात आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबईच्या सुरक्षेच्या पार्श्भूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून, केंद्रिय गृह विभाग तसेच गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या देण्यात आलेल्या सूचनांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची कल्पना देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेते आणि अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. दोन्ही देशात तणावाची युद्धजन्य परिस्थिती असल्याने मुंबई शहराची सुरक्षा महत्त्वाची आहे. मुंबईत सुरू असलेले राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे सर्व आमंदार, मंत्री, अधिकारी मुंबईत आहेत. त्यामुळे विधानभवन, आमदार निवासस्थान, आणि मंत्रालय आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पोलीसांना सध्या मुंबई आणि परिसरावराच्या सुरक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी पोलीसांना विधिमंडळाच्या सुरक्षेतून मोकळे करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले.त्याच पार्श्वभूमीवर आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत यावर विचार करण्यात येवून, सध्या सुरू असेलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवस अगोदरच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.कालच अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, उद्या दुष्काळावर चर्चा करण्यात येवून परवा यावर उत्तर दिले जाणार होते.