मंत्रालयासमोर कर्जबाजारी तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई नगरी टीम
मुंबई : आज मंत्रालयासमोर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरूणाने व्यापारात कर्जबाजारी झाल्याच्या कारणास्तव अंगावर रॅाकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.या तरूणाला मंत्रालयात तैनात असलेल्या पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
आज दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या गार्डन गेट समोर सोन्या चांदीच्या व्यापारात कर्जबाजारी झाल्याकारणाने विनायक वेदपाठक, वय वर्षे २७,सोनारगल्ली ,कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथिल तरूणाने अंगावर रॅाकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या सुरक्षेवर तैनात असणा-या पोलीसांनी या तरूणाला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, २ कोटी रोजगार वर्षाला देऊ असे आश्वासन देणारे हे सरकार आश्वास पाळू शकलेले नाही त्यामुळे तरूणांवर अशी वेळ येते आहे. ही बाब दुर्दैवी आहे. सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! तरुणांनो आत्महत्या करू नका, तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे मुंडे यांनी म्हटले आहे.