राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

मुंबई नगरी टीम

मुंबई  : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येते. मतदाराच्या नावात, पत्त्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे.

यावर्षी आतापर्यंत सुमारे ४६ लाख मतदारांसाठी नवीन ओळखपत्र तयार करून वाटपासाठी वितरित करण्यात आले आहे. नवीन ओळखपत्रासाठी मागणी केलेल्या अर्जातील एकूण ९८ टक्के मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. २०१४ मध्ये टक्केवारी ९४ इतकी होती. या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळे बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. हे ओळखपत्र पिव्हिसीपासून तयार केले असले तरी ते स्मार्ट कार्ड नाही.

 मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य,केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी  अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार,आमदार,विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

इपिक कार्ड मिळाले नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा. तेथे ओळखपत्र मिळण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर ओळखपत्र मिळण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

 

Previous articleकाँग्रेस-राष्ट्रवादी नक्कीच पडणार
Next articleरावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांमध्ये दिलजमाई