राज ठाकरे आणि शरद पवार भेटीने तर्कवितर्कांना उधाण
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाआघाडीत प्रवेश होऊ न शकल्याने एकटे पडलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाढत्या जवळिकीचे दर्शन गेल्या काही महिन्यात घडले आहे.राज ठाकरे यांनी त्याचा इन्कार केलेला नाही. आज राज ठाकरे थेट थोरल्या पवारांची भेट घेतली.या भेटीमध्ये काय घडले, हे गुलदस्त्यात आहे.मात्र या भेटीमुळे राज्यात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रंगशारदा सभागृहात झालेल्या सभेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घोषित केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.म्हणून आज लगेचच राज ठाकरे यांनी पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उत आला आहे. राज ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली,असे सांगण्यात आले.
काल राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर जोरदार टीका केली होती.मोदी आणि शहा यांच्याविरोधात प्रचार करा. फायदा व्हायचा त्यांना होऊ दे, असे आदेश काल राज यांनी मनसे कार्यकर्त्याना दिले.याचा अर्थ मनसे राष्ट्रवादीला निवडणुकीत अप्रत्यक्ष मदत करणार,हाच होता.मनसेचा राज्यात प्रभाव दिसेल,अशी प्रशंसा पवारांनी केली होती. यामुळे मनसे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसली तरीही राष्ट्रवादीला मदत होईल,असे पक्षाचे धोरण राहील,असे स्पष्ट झाले आहे.