राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘फिर एक बार मोदी सरकार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार आवश्यक असून त्यासाठी तुमचे प्रत्येकाचे मत आवश्यक असल्याची भुमिका ईशान्य मुंबईतील भाजप-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मांडली आहे. त्यामुळे सोमवारी म्हणजेच लोकसभा मतदानाच्या दिवशी प्रत्येक मुंबईकराने इतर कोणतेही काम बाजूला ठेवून प्राधान्याने मतदान करावे, असे आवाहनही कोटक यांनी केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या ग्रँड रोड शोला सुरूवात करताना त्यांनी हे आवाहन केले आहे.
ईशान्य मुंबईत गेल्या महिन्याभरात महायुतीच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनोज कोटक यांचा जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे मतदारसंघात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महायुतीतर्फे ग्रँड रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी कुकरेजा पॅलेस जवळील रेल्वे पोलीस हॉकी मैदानापासून या रॅलीला सुरूवात झाली असून महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कोटक म्हणाले की, २९ एप्रिल ही तारीख अतिशय महत्वाची असून प्रत्येक मुंबईकराने या दिवशी सर्वात अगोदर मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. शनिवार, रविवार आणि त्यानंतचा सोमवार असा लाँग विकेंड जरी असला तरीही कोणताही सहलीचा बेत न करता मतदानाला प्राधान्य देण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली. विकेंड पिकनिक तर भविष्यात पुन्हा कधीही करता येतील, मात्र पुढील पाच वर्षांसाठी केंद्रात मोदींजींच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार बनवण्यासाठी प्रत्येक मुंबईकराचे एक एक मत महत्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या ग्रँड रोड शोची सुरूवात झाली असून वल्लभ बाग, शांतीसुधा पथ, गरोडिया नगर, पुष्पविहार हॉटेल, भजन समाज, विक्रांत सर्कल, आर.बी.मेहता रोड, देरासर लेन, एमजी रोड, राजावाडी सिग्नल, भावेश्वर लेन, टीळक रोड या मार्गाने भानुशाली वाडी येथे या रोड शोचा समारोप झाला.
मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रोड शोचा समारोप भानुशाली वाडी येथे होताच रॅलीचे रुपांतर सभेत झाले. या सभेला गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संबोधित केले. याशिवाय घाटकोपर येथील कोटक यांच्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेत्री ईशा कोप्पीकर या देखील कोटक यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत सहभागी झाल्या होत्या.