विनायक राऊत राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठणा-या भाजपने संभाव्य मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा करण्यासाठी घटक पक्षांना आमंत्रण दिले आहे.संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात आणि राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या समावेशावर चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चर्चेसाठी उद्या दिल्लीचे आमंत्रण दिल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात शिवसेनेच्या समावेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी दिल्लीचे आमंत्रण दिले असून,या बैठकीत मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला कोणती खाती मिळणार यावर चर्चा करण्यात येणार आहे. एमडीएच्या घटक पक्षांत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेला महत्वाची खाती मिळणार असल्याची चर्चा आहे. याच चर्चेत राज्य सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्र्याच्या समावेशाबाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे समजते.
येत्या दोन दिवसात भाजपचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेसोबत युती केल्याने या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा झाला. त्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटी वेळी दिले. त्यामुळे केंद्र दरबारी शिवसेनेचे महत्व वाढले आहे. मुंबईत शिवसेनेचे तर भाजपते तीन खासदार निवडुन आले. राज्यातही युतीला मोठे यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजप शिवसेनेची नाराजी पत्करू शकत नाही त्यामुळेच उद्या होणा-या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. आनंदराव अडसुळ, आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, अनंत गीते या ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने कोकणात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा दुस-यांदा पराभव करणारे विनायक राऊत, भावना गवळी, गजानन कीर्तिकर, संजय राऊत, अनिल देसाई , राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.