राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात राज्यभर सभा घेवूनही कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या पदरी निराशा पडल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून सुमारे तासभर राजकीय विषयावर चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून घेतली. या भेटीत या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समजला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाआघाडीला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर कॅांग्रेस राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. वंचित आघाडीसह मनसेला विधानसभा निवडणुकीत बरोबर घेण्याची चर्चा सुरू असतानाच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर राजकीय विषयावर चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली.

मनसेने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उतरविला नसताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्यातील बहुतेक जागी काँग्रेस राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला आहे.

Previous articleराज्यात आचारसंहीतेच्या कालावधीत ९२ हजार लिटर दारू जप्त
Next articleरामदास आठवले मंत्रिपदाची शपथ घेणार