मालाड मध्ये झोपडपट्टीवर भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू
मुंबई नगरी टीम
मुंबई : दोन दिवसापासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरातील पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली असून, या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्री पासून शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहोत. धो धो कोसळणा-या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. काल रात्री सुमारे दोनच्या सुमारास येथील मालाड पूर्व पिंपरीपाडा झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली असून, यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दूर्घटनेतील जखमींना जोगेश्वरी आणि कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान काल पासून कोसळणा-या पावसामुळे आज सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली. काल रात्री पासून कोसळणा-या पावसामुळे उपनगरातील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, बोरीवली, अंधेरी, जोगेश्वरी आणि कांदिवली परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.