तिवरे धरण बाधित कुटुंबाना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
मुंबई नगरी टीम
चिपळूण : आमदार भास्करराव जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे बाधित कुटुंबांना दिली.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलेच शिवाय तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना यावेळी प्रत्येकी १ लाखाचा धनादेश देण्यात आला.
दरम्यान गावापासून दूर पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडे केली. तिवरे धरण फुटल्याने यामध्ये २४ लोकं बेपत्ता झाले होते त्यापैकी १८ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत तर अजूनही ६ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत.धरण फुटीनंतर धरणाचे ठेकेदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली शिवाय तिवरे गावातील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चाही केली. यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी व संबंधित शिवसेना आमदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.