राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा

राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा

मुंबई ‌नगरी टीम

 

परळी : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या अधिकृतपणे परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होत असून, कावेबाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी आज घाईघाईने केलेले उदघाटन हास्यास्पद असून शुध्द वेडेपणाचे आहे. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा असा उपरोधिक टोला भाजपचे पंचायत समितीचे सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे, मोहनराव आचार्य व रेणूका फड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

पालकमंत्री  पंकजा मुंडे हया ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांनी परळीला पंचायत समितीची सुसज्ज इमारत निधी देऊन उभी केली, त्यांच्याच कार्यकाळात पुर्ण देखील झाली, यामुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठी सोय झाली आहे.उद्या त्याचे अधिकृत शासकीय लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळीच घाईघाईने इमारतीचे अनाधिकृत पणे उद्घाटन करून स्वतःचे हसे करून घेतले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रताप हा काही पहिल्यांदाच घडतोय असे नाही, या अगोदरही शहरातील पांच कोटीचे रस्ता काम असो की ग्रामीण भागातील विकासाची कामे असो त्यांनी असाच उपद्व्याप केला आहे, पंचायत समितीत बहुमत असले म्हणून काहीही करायचे अन् कसेही वागायचे असते का? असा सवाल त्यांनी केला आहे.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे, खासदार, आमदार, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री भाजपच्या आहेत, असे असताना राष्ट्रवादीचे नेते विकासाची कामे आपणच केली असल्याचे भासवून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळ फेक करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक कामाचा निधी हा ना. पंकजाताई मुंडे यांनी आणला आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे मग फुकटचे श्रेय कोण लाटत आहे. जनतेची अशीच फसवणूक करीत राहिलात तर येणा-या काळात जनता तुम्हाला घरी बसविल्या शिवाय राहणार नाही असे सोनवणे, फड, आचार्य व साळवे यांनी म्हटले आहे.

Previous articleएसईबीसी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती लागू
Next articleपार्किंगच्या जुलुमी फतव्या विरोधात लढा देण्याची गरज : शरीफ देशमुख