अजित पवार यांना हरविणे हे दिवास्वप्न ठरेल
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करणे, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे आणि २०२४ साली बारामतीची लोकसभा जागा जिंकणे हे आपले प्राधान्यक्रम असतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जाहीर केले.तीन महिन्यांत येणा-या विधानसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसनेते अजित पवार यांना हरविणे हे दिवास्वप्न ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेश कार्यालयात आज चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. शिवसेनेसह आरपीआय, रासप व इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन पुन्हा महायुतीचेच सरकार आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण कार्यकर्ता राजकारणी आहोत खरे तेच बोलतो हवेतले सांगत नाही असेही ते म्हणाले.आगामी विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल तसेच युतीतील कोणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील.आगामी विधानसभा निवडणूका भाजप मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.इव्हीएममध्ये घोटाळा नाही त्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे याकडे भाजप प्रदेशाध्यक्षांनी लक्ष वेधले. शिवसेना सत्तेत आहे तरी सरकार विरोधात मोर्चे काढते याबाबत प्रश्न विचारला असता,जनतेच्या प्रश्नांवर भाजप कार्यकर्त्यांनीही मोर्चे, निदर्शने काढण्यास हरकत नाही असेही ते म्हणाले.
सत्तेत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तरात ते म्हणाले, आपण स्वता अभाविपमधून १३ वर्ष जबाबदारी पार पाडून पुढे आलो आहोत. अन्याय कोणावर होत असतील तर दूर करण्याचा प्रयत्न करू, रात के बात दिन आताही है असेही त्यांनी सांगितले.पक्षाला आवश्यकता म्हणून आपली निवड प्रदेशाध्यक्षपदी झाली आहे, वेळेचे नियोजन करून राज्यभरात दौरे करून पदाला न्याय देऊ असेही पाटील म्हणाले. संघटनेला मजबूत करणे, हा माझा उद्देश आहे. अन्य पक्षांतील कुणी भाजपमध्ये येत असतील त्यांना आम्ही पक्षात घेऊ. काँग्रेसने जे ५ कार्याध्यक्ष नेमले त्यातीलह उद्या कुणी भाजपमध्ये आल्यास तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे, हे माझे प्राधान्य आहे, असे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगून, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती २२० चा आकडा पार करेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.