आघाडीचे सरकार आल्यावर कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

आघाडीचे सरकार आल्यावर कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

मुंबई नगरी टीम

यवतमाळ : आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुसद येथील जाहीर सभेत दिले.

हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते लोकांना दुधखुळे समजता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. कुठल्या दिशेने राज्य चाललंय. वसंतराव नाईक सुधाकर नाईक, शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करुन टाकले आहे असेही  पवार म्हणाले. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचे सातबारा कोरा केला ते जाहीर करावे असे जाहीर आव्हान  त्यांनी सरकारला दिले.मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलत आहेत.राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. पी चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. करा चौकशी परंतु ज्यापध्दतीचे राजकारण केले जात आहे हे योग्य नाही असेही पवार म्हणाले.

कृषिप्रधान राज्य करण्याचे काम सुधाकर नाईक यांनी केलं आहे असेही पवार यांनी सांगितले. पुरग्रस्त परिस्थितीला देवेंद्र फडणवीस व येडियुरप्पा यांचे सरकार जबाबदार आहे असा आरोपही पवार यांनी केला. यवतमाळ जिल्हयात सात जागा आहेत तुम्ही त्या निवडून आणू शकता. याअगोदरचा इतिहास मी विसरलो नाही याची आठवण अजितदादा पवार यांनी यवतमाळ जिल्हावासियांना करुन दिली.या राज्याला मजबुत… कणखर… शब्द पाळणारं… तरुणांना… अठरापगड जातीतील लोकांना काम देणारं… गोरगरीबांचे… रयतेचे राज्य आणुया असे आवाहन पवार यांनी केले.

Previous articleआचारसंहितेच्या धसक्याने मंत्रालय “हाऊसफुल्ल”
Next articleईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी