पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार “गणपती बाप्पा मोरयाचा” जयघोष 

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार “गणपती बाप्पा मोरयाचा” जयघोष 


मुंबई नगरी टीम

कोल्हापूर  कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. तर अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक  कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा ?असा प्रश्न जिल्ह्यातील गणेश भक्तांसमोर निर्माण झाला होता.दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने ही व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक  कुंभार समाज बांधवांच्या माध्यमातून या मूर्तीचे वितरण करण्यात येणार आहेत.

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेश मूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरुंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हे दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातिल बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या.कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांची समस्या जाणून घेतल्या. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरुंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.

Previous articleमहापर्दाफाश सभांच्या माध्यमातून काँग्रेस करणार महाजनादेश यात्रेची पोलखोल
Next articleभरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला धू धू धुतले