शिवसेना-भाजपा युती होणारच : उध्दव ठाकरे
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच शिवसेनेशी युती होणार असल्याची घोषणा केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक युती म्हणूनच लढवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
मातोश्रीवर आज पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार असा विश्वास व्यक्त केला.सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू असून, या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेशी युती होणारच असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजपा युती होणार आहे आणि आम्ही युती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.सत्तेला हापापलेले नेते आमच्याकडे येतात असे नाही. ज्यांना पक्षासाठी काम करायची इच्छा आहे त्यांनाच आम्ही प्रवेश देतो असेही त्यांनी स्पष्ट करून अजून काही नेते वेटिंगवर असून त्यांनाही शिवसेनेत प्रवेश दिला जाईल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.