आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक पदास मान्यता
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांपैकी १२१ शासकीय आश्रमशाळा व १५४ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या (११ वी १२ वी) कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञानशाखेला प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित असे विषय असून या शाखेसाठी तीन पदे मंजूर आहेत. एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते. त्यामुळे त्याच्यावरील कार्यभार अधिक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होत होता. याचा विचार करून सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आकृतिबंधामध्ये सुधारणा करून विज्ञान शाखेसाठी चार शिक्षकांची तरतूद करण्याचा आज निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक उपलब्ध होणार आहेत. आश्रमशाळेत ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या पंचवीस हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच त्यांना एनईईटी किंवा जेईई, सीईटी व संबंधित परीक्षांद्वारे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठीही फायदा होणार आहे.
यापूर्वी आदिवासी विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळांपैकी १० शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि ११ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ देऊन इयत्ता ११ वी व १२ वीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आश्रमशाळा वगळून उर्वरित सर्व शासकीय व अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे एक अतिरिक्त पद मंजूर करण्यास आज मान्यता देण्यात आली. त्यानुसार १११ शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी १११ पदे तसेच १४३ अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी १४३ पदे अशी एकूण २५४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार प्रशिक्षित पात्रताधारक उमेदवारांमधून तसेच शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येणार आहे. भविष्यात उच्च माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ मिळाल्यास त्या शाळांमध्ये देखील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या प्रत्येक विषयासाठी शिक्षण विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणाप्रमाणे ३ ऐवजी ४ विज्ञान शिक्षकांची पदे मंजूर करण्यासही मान्यता देण्यात आली.