शुक्रवारी शिवसेना आमदारांची  महत्वपूर्ण बैठक

शुक्रवारी शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक

मुंबई नगरी टी

मुंबई: राज्यातील सत्ता तिढा कायम असताना आता सत्तास्थापनेस वेग आल्याचे चित्र आहे. उद्या नवी दिल्लीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे तर येत्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे.या बैठकीत सत्तापेचावर चर्चा होणार असल्याने शिवसेनेच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नवी दिल्लीत केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच राज्यातील आणि केंद्रातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत होत आहे.या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि सत्तापेचावर प्रामुख्याने चर्चा करण्यात होण्याची शक्यता आहे.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन करायचे असल्यास या सरकारमध्ये असणारे सत्तेचे वाटप आणि पुढील राजकीय भूमिका यावर चर्चा होणार असल्याचे समजते.राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी व्हावे यासाठी काँग्रेस अध्यक्षांवर नवनिर्वाचित आमदारांनी दबाव आणला असल्याची चर्चा आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक येत्या शुक्रवारी मुंबईत आयोजित केली आहे. शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. शिवाय शिवसेना एनडीएतूनही पडली आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून महिना होत असतानाही  राज्यात सरकार स्थापन न झाल्याने सर्वच पक्षांच्या आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

Previous article५ जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी ७ जानेवारीला निवडणुका
Next articleराज्यात लवकरच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे स्थिर सरकार