प्रचारात स्थान दिले असते तर भाजपाचे अजून २५ आमदार निवडून आले असते : एकनाथ खडसे

प्रचारात स्थान दिले असते तर भाजपाचे अजून २५ आमदार निवडून आले असते : एकनाथ खडसे

मुंबई नगरी टीम

मुंबई : विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि मला पक्षाने किमान निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले असते तर भाजपचे किमान २० ते २५ आमदार अजून निवडून आले असते. मात्र पक्ष वाढवणा-यांना बाजूला ठेवले गेले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसते असा घरचा आहेर माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि मला पक्षाने किमान निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले असते तरी आजचे महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. त्यासाठी आम्ही पक्षाला दोष देणार नाही. पक्ष कधीही चुकत नसतो. पक्षासाठी निर्णय घेणारे नेते चुका करतात. अनेक वर्षे मी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. दगडधोंडे, शेणाचा मारा सहन केला; मात्र मला हेतूपरस्पर बाजूला ठेवले गेले. तिकीट दिले गेले नाही. तो निर्णय आम्ही मान्य केला; मात्र पक्षाच्या प्रचारातही आम्हाला स्थान दिले गेले नाही. ते दायित्व आमच्यावर सोपवली गेली असती, तर भाजपचे किमान २० ते २५ आमदार अधिक निवडून आले असते; मात्र पक्ष वाढवणा-यांना बाजूला ठेवले गेले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसते असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

आम्ही विरोधात असताना तेव्हा रद्दीचा भाव अधिक होता. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, असा टोलाही खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लावला आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षात असताना सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वेळी बैलगाडी भरून कागदपत्रे पुरावे म्हणून देवेंद्र फडणवीस विधीमंडळ अधिवेशनाच्या ठिकाणी घेऊन आले होते; मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ केले. यावरून एकनाथ खडसे यांनी वरील वक्तव्य करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. या वेळी एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Previous articleमी….आमदार  रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की !
Next article“या वारकरी” दाम्पत्यासह ४०० शेतकरी शपथविधीला उपस्थित राहणार