“या वारकरी” दाम्पत्यासह ४०० शेतकरी शपथविधीला उपस्थित राहणार

“या वारकरी” दाम्पत्यासह ४०० शेतकरी शपथविधीला उपस्थित राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही मंत्री उद्या दादर येथील शिवतीर्थावर होणा-या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची  शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. महत्वाच्या नेत्यांसह राज्यातील काही शेतक-यांसह शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने पंढरपूरची वारी करणारे संजय सावंत आणि  रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

उद्या शिवतीर्थावर होणा-या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी शिवतीर्थावर चालू आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आणि देशातील महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. महत्वाच्या नेत्यांसह या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील काही खास व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. ते कोणी राजकीय नेते नसून, राज्यातील कष्टकरी शेतकरी उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध भागातील सुमारे ४०० शेतक-यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे एका वारकरी दाम्पत्याला दिलेला शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने पंढरपूर वारी केलेले संजय सावंत आणि रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यातील काही गावांचा दौरा केला होता. त्यावेळी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना शपथविधीसाठी उभारण्यात येणा-या व्यासपीठाजवळ  मला जवळ उभे राहण्याची संधी द्यावी अशी विनंती ठाकरे यांना केली होती.त्यावर ठाकरे यांनी सावंत यांचा भ्रमणध्वनी घेत तुम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण नक्की देणार असे वचन त्यांनी सावंत यांना दिले होते. त्यानुसार शिवसेनेने संजय सावंत यांना निमंत्रित दिले असून, ते सांगलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Previous articleप्रचारात स्थान दिले असते तर भाजपाचे अजून २५ आमदार निवडून आले असते : एकनाथ खडसे
Next articleसरकारमध्ये “या” नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता