मी….आमदार  रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की !

मी….आमदार  रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की !

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्यातील सत्तास्थापनेचा सारीपाटाचा गेले महिनाभर चाललेला खेळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीने जिंकल्यानंतर आज निवडून आलेल्या  २८६ सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली आहे.परंतु राष्ट्रवादीचे सदस्य रोहित पवार यांनी शपथ घेताना रोहित सुनंदा राजेंद्र पवार अशी शपथ घेवून सर्वांनाच सुखद धक्का दिला.संजय बनसोडे यांनीही आपल्या संपूर्ण नावाचा उच्चार करताना आईचेही नाव घेतले.

नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथ सोहळा विधानभवाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात पार पडला.कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार  रोहित पवार यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेताना मी आमदार रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केल्याने सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनाही सुखद धक्का बसला.संजय बनसोडे यांनीही शपथ घेताना आपल्या संपूर्ण नावाचा उच्चार करताना आईचेही नाव घेतले.या दोन्ही आमदारांनी शपथ घेताना आपले वेगळेपण दाखवून दिले. एकदिवसीय विशेष अधिवेशनाला प्रारंभ झाल्यानंतर ज्येष्ठ सदस्य बबनराव पाचपूते यांनी सर्वप्रथम ईश्वरसाक्ष शपथ घेतली. आज शपथ घेणा-यांपैकी २२७ जणांनी ईश्वरसाक्ष, ७ जणांनी अल्लासाक्ष, जितेंद्र आव्हाड यांनी मातृसाक्ष शपथ घेतली. संजीव रेड्डी यांनी संस्कृतमधून तर इशांत बाबा सिद्दिकी यांनी इंग्रजीतून, तर कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेतून शपथ घेतली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणा-यांत तिसरा क्रमांक होता. माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठव्या क्रमांकावर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवव्या ,तर राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दहाव्या क्रमांकावर,शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी 25 व्या क्रमांकावर तर  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३५ व्या क्रमांकावर शपथ घेतली.

ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. आदित्य ठाकरे हे शपथविधीसाठी जाताना व परतताना सभागृहातील सदस्यांनी जोरदार बाके वाजवली. राष्ट्रावादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी व संजय बनसोडे या दोघांनी आपल्या  संपूर्ण नावाचा उच्चार करताना आईचेही नाव घेतले.तर राजेश नरसिंग पाटील यांनी आपली शपथ बेळगाव  कारवार निपाणीच्या सीमावासियांना साक्ष ठेवून घेतली. सर्वात शेवटी शपथ घेणारे सदस्य राहूल कूल हे होते.राज्यातील सत्तापेचामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होवू शकला नव्हता.मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आणि भाजपा सरकारने राजीनामा दिल्याने अखेर आज झालेल्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली.आज एकूण 286 आमदारांचा शपथविधी पार पडला तर माजी मंत्री भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार हे अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. कालिदास कोळंबकर यांना कालच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे.

विधानसभेत आज गेले आठवडाभर रहस्यमय  राजकारणाचा  केंद्रबिंदू ठरलेल्या अजित पवार यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अजित पवार गेले पाच वर्ष ज्या पहिल्या रांगेत राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या बाजूस बसत होते तेथेच विराजमान होते. आठवडाभराच्या गतिमान पण ऩंतर फसलेल्या खेळाची कोणतीही उदासिनतेची छटा त्यांच्या चेह-यावर दिसत नव्हती.उलट राष्ट्रावादी काँग्रेसचा प्रत्येक सदस्य शपथ घेतल्यावर अजित पवार यांना भेटून अभिवादन करत होता. विधानसभेच्या निमंत्रित सज्जात राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे, लोकसभा खासदार व माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषद उपसभापती निलम गो-हे हे उपस्थित होते.

Previous articleउद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री
Next articleप्रचारात स्थान दिले असते तर भाजपाचे अजून २५ आमदार निवडून आले असते : एकनाथ खडसे