पंकजा मुंडे येत्या १२ डिसेंबरला मोठी घोषणा करणार ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये परळीमधून माजी ग्रामविकासमंत्री आणि बीडच्या माजी पालकमंत्री मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.त्यांचे बंधू आणि माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता.सर्वाधिक जागा शिवसेना आणि भाजपाला मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेवून मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा होती.मात्र राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने हि शक्यता मावळली असून,आता पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी काल रविवारी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे.१२ डिसेंबर राजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे.याच दिवशी गोपीनाथगडावर होणा-या कार्यक्रमात पंकजा मुंडे या मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.त्यामुळे येत्या १२ डिसेंबरला त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार की, वेगळा विचार करणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी….
नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…
निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.
‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .
मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.
१२ डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?
१२ डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!